मुंबई : आजचे बालक हेच भविष्यातील शास्त्रज्ञ असून, तंत्रज्ञान हा भविष्यनिर्मितीचा कणा आहे, असे प्रेरणादायी उद्गार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी काढले. मानवाशी संबंधित विविध समस्यांच्या निराकरणासाठी बालकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईत आयोजित १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेत बालविज्ञान परिषदेचे उद्घाटन अब्दुल कलाम यांच्या हस्ते रविवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. बालकांनी भविष्यात करिअरचा पर्याय म्हणून मानवी विकासासाठी विज्ञान क्षेत्राचा विचार करावा, असे आवाहन कलाम यांनी केले. या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भातील विविध उदाहरणांचा दाखला त्यांनी दिला. मंगळ यानाच्या यशस्वी मोहिमेबद्दलही त्यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. विज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी कलाम यांच्या हस्ते या वेळी नऊ बालकांना इन्फोसिस पुरस्काराने गौरविण्यात आले. तत्पूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचेही कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बालकांनी तयार केलेली विविध साधने या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञान हा भविष्यनिर्मितीचा कणा -कलाम
By admin | Published: January 05, 2015 7:27 AM