पुणे : ‘शैक्षणिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येत असून त्याचा उपयोग शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन ज्ञानात भर घालावी. कालसापेक्ष अभ्यासक्रमांचा सातत्याने पाठपुरावा केल्यास गुणवत्तेबरोबरच करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना मदत होईल,’ असे मत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) पदवीग्रहण समारंभाप्रसंगी डॉ. विद्यासागर बोलत होते. संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम, प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशिष पुराणिक व महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख डॉ. गौतम बेगाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बीकॉमच्या २९४, बीसीएच्या २६, बीबीएच्या ६७ आणि बीबीएमआयबीच्या ३४ अशा एकूण ४२१ विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
कौशल्यविकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा
By admin | Published: March 03, 2017 12:59 AM