नाशिक : शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत असलेल्या मालेगावच्या व्यावसायिकाच्या मुलाची २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वरजवळ शुक्रवारी त्याचा मृतदेह सापडला.मोहितेश बाविस्कर (१७) असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून तो मालेगावचे व्यावसायिक प्रलिन बाविस्कर यांचा मुलगा आहे. सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितेश आयआयटी परीक्षेच्या क्लाससाठी नाशिकमधील गोळे कॉलनीतील वसतिगृहात मित्रांसोबत राहत होता़ बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले़ तर गुरुवारी त्याच्या मोबाइलवरून प्रलिन बाविस्कर यांच्या मोबाइलवर फोन करून अज्ञात व्यक्तीने २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. रक्कम न दिल्यास मोहितेशला ठार मारण्याची धमकी दिली़ त्यानंतर बाविस्कर यांनी गुरुवारी रात्री सरकारवाडा पोलीस ठाण्यात मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याची फिर्याद दिली़ शुक्रवारी त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील एका शेताच्या मोरीजवळ अज्ञात युवकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी डी़ आऱ पाटील यांना मिळाली़ त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला़ शनिवारी सकाळी अज्ञात मृतदेहाची चौकशी करण्यासाठी बाविस्कर कुटुंबीय गेले असता त्यांना तो मोहितेशचा असल्याचे आढळले. मोहितेशचे मित्र-मैत्रिणींशी वैर होते का, याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.खंडणीसाठी खुनाची दुसरी घटना : तीन वर्षांपूर्वी पंचवटीतून ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबचंद बाफणा यांचा मुलगा विपीन याचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते़ बाफणा कुटुंबीय पोलिसांत गेल्याची कुणकुण लागताच संशयितांनी विपीनची हत्या केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या पंचवटीतील सहा संशयितांवर मोक्का अन्वये खटला सुरू आहे़मोहितेशच्या डोक्यात जबर प्रहार करून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे़ त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ - देवीदास पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर
खंडणीसाठी युवकाची हत्या
By admin | Published: October 18, 2015 1:23 AM