ऑनलाइन लोकमत
भंडारा,दि.19 - आईसोबत भांडण झाल्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या एका तरूणीवर वरठी येथील चार तरूणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून वरठी पोलिसांनी चारही तरूणांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
वरठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभा येथील एक तरूणीचे आईसोबत शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर ही तरूणी घरातून निघून गेली. १३ एप्रिलला घरून बाहेर पडल्यानंतर ही मुलगी वरठी येथे एकटी फिरत असताना पाहून एका तरूणाने तिची विचारपूस केली. घरून भांडण करून आल्याचे कळताच त्याने घरी सोडून देतो, असे सांगून आपल्या एका मित्राला दुचाकी घेऊन बोलावून घेतले. दरम्यान त्या युवतीला पांढराबोडी शेतशिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर १४ व १५ एप्रिलला वरठी येथे एका घरी आणि वरठीपासून तीन किलोमीटर अंतरावरील खोडगाव येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यावेळी या तरूणांनी आणखी दोन तरूणांना युवकांना बोलावून घेतले. या चारही जणांनी जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
१३ एप्रिलला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या आईने वरठी पोलिसांत नोंदविली आहे. १७ एप्रिलला सदर तरूणी सिरसी शेतशिवारात बेशुद्ध पडून असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मुलीला रूग्णालयात दाखल केले. आज बुधवारला सायंकाळी तरूणी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी बयाण नोंदविले आहे. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरठी येथील अंकित चव्हाण, अर्पित लोणारे, राकेश भिवगडे व इम्तियाज शेख या चार तरूणांना ताब्यात घेतले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी आरोपींची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. या घटनेचा तपास वरठीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश खंडाते हे करीत आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून कबुलीजबाब नोंदविल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.