मुंबई : राज्यातील शाळांमध्ये मुला मुलींना लैंगिक शिक्षणाच्या ऐवजी किशोरवयीन शिक्षण हा विषय आणण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांशी बोलणे सुरु असून हा विषय लवकरच अभ्यासक्रमात आणला जाईल ,असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. विद्यार्थिनिंची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यादृष्टीने फक्त शाळा व महाविद्यालयांत केवळ सी.सी.टी.व्ही लावणे हा एकच विषय नसून शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांंना किशोरवयीन आरोग्य शिक्षणाचे धडे देणे सुध्दा तितकेचे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने या सर्व बाबींचा विचार करुन एक परिपूर्ण आराखडा बनविण्यासाठी मानसोपचार तज्ञ, विधी मंडळातील महिला सदस्य, शाळा व महाविद्यालयांमधील प्राचार्य आदींची एक समिती नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा तावडे यांनी केली. राज्यातील ग्रामीण भागांतील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी अनुदान देण्याबाबतचा प्रश्न सुभाष झांबड, हेमंत टकले, किरण पावसकर आदी सदस्यांनी उपस्थित केला. तावडे म्हणाले, महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या दृष्टीने न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी समिती नेमली होती. या समितीने शाळा व महाविद्यालयांत सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असल्याचे नमूद केले होते. या मुद्दयांचाच विचार करता शाळा आणि महाविद्यालयात होणारे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना किशोरवयीन आरोग्य शिक्षण देण्याची गरज आहे. सीसीटीव्ही कॅमेरा पुरावा म्हणून कामास येतो. परंतु, असे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने विभागामार्फत समिती नेमण्यात येईल. नगर तसेच राज्यातील अनेक भागात दिवसेंदिवस विद्याथीर्नींवर अत्याचाराचे प्रकार वाढत चालले असून शाळेतील विद्याथीर्नी अशा प्रकारांना बळी पडत आहेत. त्यादृष्टीने शाळा आणि महाविद्यालयाच्या आवारातील सुरक्षा कशी चांगली राहतील यासाठी ही समिती विचार करेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
किशोरवयीन शिक्षण अभ्यासात आणू
By admin | Published: July 22, 2016 4:19 AM