औरंगाबाद : येथील इंडियन कॅडेट फोर्सचा कॅडेट किशोर नावकर याने प्रतिकूल परिस्थितीत आणि जिकडेतिकडे बर्फच बर्फ अशा खडतर मार्गावर मात करीत, लेह लडाखमधील २0 हजार १८२ फूट उंचीवर असणारे स्टोक कांगरी शिखर सर करण्याचा पराक्रम केला.किशोर नावकर दोन दिवस बेस कॅम्पवर होता. त्यानंतर, २४ जून रोजी रात्री १२ वाजता त्याने प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात केली आणि २५ जून रोजी पहाटे ५.३0 वाजता त्याने हे शिखर सर केले. ही मोहीम यशस्वी केल्यानंतर आनंदित झालेल्या किशोर नावकर याने दक्षिण आफ्रिका खंडातील किलिमंजरो आणि युरोप खंडातील एल्ब्रूस शिखर सर करण्याचे आपले स्वप्न असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या शिखर मोहिमेसाठी किशोर नावकर याच्यासह कृष्णा पटेल, संदीप रुद्राक्ष हे १४ जून रोजी औरंगाबाद येथून रवाना झाले होते. ही शिखर मोहीम इंडियन कॅडेट फोर्सच्या सहकार्याने स. भु. संस्थेच्या शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. शिखर सर करताना किशोर नावकर याच्याबरोबर त्याचे गाइड बुद्धिप्रकाश सोबत होते. किशोर नावकर याला इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल स. भु. संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, उपाध्यक्ष जवाहरलाल गांधी, सरचिटणीस दिनेश वकील, कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, ज्ञानप्रकाश मोदानी, आयसीएफचे नंदू पटेल, जगदीश खैरनार, प्रभूलाल पटेल, आनंद आंचलकर आदींनी त्याचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)
किशोरने केले ‘स्टोक कांगरी’ सर
By admin | Published: June 28, 2016 3:25 AM