- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून पलायन केलेल्या, मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या अलिबाग येथील आलिशान फार्म हाउसवर गुरुवारी जप्ती आणली आहे. १७ एकर परिसराच्या या फार्म हाउसची किंमत सुमारे १०० कोटी असून, माल्ल्याच्या मांडवा फार्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नियंत्रण आहे. त्याच्या जप्तीविरुद्धची याचिका अपिलीय लवादाने दोन दिवसांपूर्वी फेटाळून लावली होती. त्यामुळे ताब्याची रीतसर कारवाई गुरुवारी पूर्ण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कर्जबुडव्या माल्ल्याच्या ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरू आहे. त्याप्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीने या फार्म हाउसवर जप्तीची नोटीस बजाविली होती. या फार्म हाउसची नोंदणीकृत किंमत २५ कोटी असली, तरी प्रत्यक्षात बाजारभावानुसार त्याचे मूल्य १०० कोटी रुपये असल्याचे, अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी जून महिन्यात आयडीबीआय बँकेच्या ९००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माल्ल्याची मुंबई आणि बंगळुरू येथील १,४११ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली होती. यात माल्ल्याचे बॅँकेतील ३४ कोटी, मुंबई व बंगळुरू येथील अनुक्रमे १३०० व २२९१ चौरस फुटांची घरे, चेन्नईतील ४.५ एकरचा भूखंड, कूर्गमधील कॉफीची बाग, युबी सिटी आणि बंगळुरू येथील निवासी, तसेच औद्योगिक बांधकामे आदींचा समावेश आहे.