लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अत्याधुनिक वेगवान मुंबई-करमळी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमधील चोरीला आळा घालण्यासाठी, रेल्वेने आता लोकल उपाय योजले आहेत. त्यानुसार, प्रवाशांना गाणी आणि चित्रपट ऐकण्यासाठी ब्रँडेड हेडफोनऐवजी लोकल हेडफोन्स देण्यात येणार आहेत. ब्रँडेड हेडफोनची किंमत २०० रुपये आहे. ब्रँडेड हेडफोनप्रमाणे सुविधा देणारे लोकल हेडफोनची किंमत मात्र ३० रुपये आहे.प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजसमध्ये वैयक्तिक एलईडी स्क्रीनमध्ये ‘प्री-लोडेड’ चित्रपट आणि गाणी आहेत. मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी ट्रेनमध्ये आयआरसीटीसीच्या वतीने हेडफोन पुरवले जात आहेत. नामांकित कंपनीचे हे ब्रँडेड हेडफोन चोरीला गेल्याने रेल्वेला आर्थिक नुकसान होते, शिवाय पुढील फेरीतील प्रवाशांचीदेखील गैरसोय होते. तेजसमधून आतापर्यंत ३०० हून अधिक हेडफोन चोरीला गेल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी ३० रुपये दराने १ हजार हेडफोन खरेदी केले आहेत.‘विमानाच्या सुविधा ट्रेनमध्ये मिळावी’ या धर्तीवर तेजस एक्स्प्रेस बांधण्यात आली होती. त्या वेळी संपूर्ण वातानुकूलित ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी अटेंडर, वैयक्तिक एलईडी स्क्रीन, वाचन करण्यासाठी अॅडजेस्ट होणारे हेडलाईट्स, वाय-फाय अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.एक ट्रेन दोन कंत्राटदार प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादात तेजस एक्स्प्रेस सुरू आहे. १३ डब्यांमध्ये प्रवासी आसन व्यवस्था असलेल्या तेजसमध्ये एलईडी स्क्रीनमध्ये चित्रपट, गाणी ‘प्री-लोड’ करण्याचे कंत्राट दोन वेगवेगळ््या कंत्राटदारांना देण्यात आले आहे. त्यात आठ डब्यांचे कंत्राट एका कंत्राटदाराला आणि अन्य कंत्राटदाराला उर्वरित डब्यांचे कंत्राट देण्यात आले आहे. यात हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, गेम्स यांचा समावेश आहे.
तेजस एक्स्प्रेस : हेडफोन चोरीवर ‘लोकल’ उपाय
By admin | Published: May 29, 2017 4:54 AM