महेश चेमटे/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11- अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ‘आयआरसीटीसी’ने जय्यत तयारी केली आहे. ताशी २०० कि.मी. धावण्याची क्षमता असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात उकडीचे मोदक प्रवाशांना देण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळातील सुरुवातीच्या ३ फे-यांमधील प्रवाशांना या मोदकांचा आस्वाद घेता येणार आहे. परिणामी गणेशोत्सवात ‘तेजस’ ने प्रवास करणा-या प्रवाशांना 'उकडीच्या मोदकां'चा प्रसाद मिळणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) उकडीचे मोदक वाटप करण्यात येणार आहे. प्रवाशांना सणासुदीच्या काळात गोड पदार्थ देण्याचा आयआरसीटीसीचा प्रयत्न आहे. त्यानुसार मकर सक्रांतीला तीळगुळ आणि लाडू, दस-याला जिलेबी, गुडीपाडव्याला पुरणपोळी, दिवाळीला मिठाई यांचे वाटप आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे. गणेशोत्सवकाळातील तेजस एक्स्प्रेसच्या तीन परतीच्या फे-यांमध्ये मोदक वाटप करण्यात येणार असल्याचे आयआरसीटीसीच्या सूत्रांनी दिली.
तेजस एक्स्प्रेसच्या आधी गतवर्षी राजधानी एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोदक पुरवण्यात आले होते. राजधानीच्या प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या या उपक्रमाचे कौतुक करून आनंद व्यक्त केला होता. भारतीय रेल्वेचा आधुनिक चेहरा अशी ओळख ‘तेजस एक्सप्रेस’ ची आहे. ताशी २०० किमी धावण्याची क्षमता असलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये वायफाय, एलईडी स्क्रीन, अटेंडर, मोबाईल चार्जिंग अशी सुविधा आहे. त्याचबरोबर मुंबई ते करमळी (गोवा) हे अंतर अवघ्या साडे आठ तासांत पार करते, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.