- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस दाखल झाली आहे. तब्बल २०० किमी वेगाने अंतर कापणारी ही टे्रन अत्याधुनिक सुविधेसह सज्ज असून २२ मे रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच मुंबई- करमळी (गोवा) असा प्रवास करणार आहे. तेजसमुळे मुंबई-गोवा प्रवास फक्त साडेआठ तासांत पूर्ण करता येणार आहे.कपूरथला येथील रेल्वे कारखान्यात तेजस घडविण्यात आली आहे. तेजसची क्षमता ताशी २०० किमी आहे. मात्र, रुळाची क्षमता नसल्यामुळे ती १३० किमी चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला मुंबई-गोवा नंतरच्या काळात मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनऊ, दिल्ली-चंदीगड अशी चालवण्यात येणार असल्याची माहिती प्रभू यांनी दिली.ट्रेन क्रमांक २२११९ सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस पहाटे ५ वाजता सीएसटी येथून सुटणार असून, करमळी येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक २२१२० करमळी येथून दुपारी अडीच वाजता परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे. मार्गावरील दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.सध्या ही टे्रन आठवड्यातील बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पाच दिवशी धावणार आहे, तर मान्सून काळात सीएसटी- करमळी सोमवार, बुधवार शनिवार आणि करमळी-सीएसटी मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे.
या सुविधा मिळणारआधुनिक ट्रेनच्या धर्तीवर घडविण्यात आलेल्या तेजसमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरा, अटेंडर, एलईडी स्क्रीन, चार्जिंग पॉइंट अशा सुविधा पुरवण्यात येणार आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला (ट्रेन क्र.०२११९), २२ मे रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. सीएसटी येथून ही ट्रेन दुपारी ३.२५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी १२.३५ वाजता पोहोचणार आहे. या बहुप्रतीक्षित ट्रेनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सीएसटी येथील अधिकारी, कर्मचारी जय्यत तयारी करत आहेत.- देशातील अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेसचे ‘सीएसटी ते करमळी’ एक्झिक्युटिव्ह एसी चेअरचे तिकीट तब्बल २ हजार ७४० रुपये आहे. खाद्यपदार्थांची सेवा न घेता २५८५ रुपये इतके तिकीट तेजससाठी आकारण्यात येणार आहे. एसी चेअरचे तिकीट १ हजार ३१० आणि खाद्यपदार्थ सेवा न घेता १ हजार १८५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. - ‘दादर ते करमळी’ २ हजार ७२५ रुपये आणि १ हजार २९५ रुपये तर ‘ठाणे ते करमळी’ २ हजार ६८० रुपये आणि १ हजार २८० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई-गोवा विमानाचे तिकीट १ हजार ५८४ रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे तेजसच्या एक्झिक्युटिव्ह एसी चेअरचे तिकीट विमानापेक्षाही महाग आहे.