कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू, कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिचा विवाह पुणेस्थित बांधकाम व्यावसायिक समीर दरेकर यांच्याशी गुरुवारी (दि. ११) ला दुपारी १२:३० च्या मुहूर्तावर होणार आहे. त्यामुळे ती आता पुणेकर होणार आहे. नेमबाजीतील अनेक शिखरे पादाक्रांत करत तेजस्विनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात विशेष कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा उपसंचालक पदाची जबाबदारी पार पाडत आहे. या जबाबदाऱ्यांबरोबरच आता तेजस्विनी गुरुवारी (दि.११) बोहल्यावर चढणार असून पुणे येथील समीर दरेकर यांच्याशी तिचा विवाह होणार आहे. समीर हे स्थापत्य अभियांत्रिकीतील उच्च पदवीधर असून बांधकाम व्यावसायिक आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीत तेजस्विनीला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. समीर यांचे स्थळही पालकमंत्री पाटील यांनीच शोधले असून विवाहात तेच कन्यादान करणार आहेत. लग्नाची तयारी ‘तेज’ बंगल्यात जोरदार सुरू आहे. २०१०मध्ये तिने जर्मनी येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल तिची ‘विशेष कार्यकारी अधिकारी व क्रीडा उपसंचालक’ म्हणून थेट नियुक्ती केली. (प्रतिनिधी)
तेजस्विनी आता होणार पुणेकर
By admin | Published: February 05, 2016 4:09 AM