नागपूर : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांर्पयत सर्व स्तरावर डॉक्टरांची उपलब्धता, यंत्रसामग्रीची सज्जता, वेळेत रक्तपुरवठा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. औषधांचा तुटवडा जाणवू नये याकरिता ई-औषधी पद्धत लागू केली जाईल. दुर्गम भागातील लोकांना शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्याकरिता या भागास टेलिमेडीसीनद्वारे जोडण्याची शिवसेनेची योजना अमलात आणण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.
प्रश्न - आरोग्य खात्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे?
डॉ. सावंत- प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र व जिल्हा शासकीय रुग्णालये यांच्यातील कमतरता दूर करणो ही आपली प्राथमिकता आहे. या ठिकाणी डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येतील. सिटीस्कॅन यंत्रपासून अनेक यंत्रयंत्रणा नादुरुस्त असतात. ही परिस्थिती बदलण्यात येईल. याच बरोबर शहरातील आरोग्य यंत्रणोचीही तितकीच काळजी घेतली जाईल. डीएनबी व सीपीएस यासारखे पदविका अभ्यासक्रम सरकारी हॉस्पिटलमध्ये राबवून डॉक्टरांची कमतरता दूर केली जाईल. रक्तपेढय़ांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्यात येईल. एनआरएचएमच्या माध्यमातून अन्य खात्यांशी संपर्क साधून याबाबतच्या योजनांना गती दिली जाईल. राष्ट्रीय स्वास्थ योजना अन्य राज्यांत राबवली जात आहे. महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्याचबरोबर राजीव गांधी जीवनदायी योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा योजनांकरिता एक खिडकी योजना राबवण्यात येईल.
प्रश्न - राज्यात अनेक ठिकाणी औषधांचा नियमित पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्ण मरण पावतात. या समस्येवर कशी मात करणार?
डॉ. सावंत- औषधांचा तुटवडा जाणवू नये याकरिता ई-औषध पद्धती सुरु करण्यात येईल. जेथे त्याचे नेटवर्क नसेल तेथे ते तयार करण्यात येईल. जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी औषधांचा साठा संपुष्टात येऊ लागला की औषध पुरवठय़ाचा अॅलर्ट जारी केला जाईल. ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे नेमके काय? याची परिभाषा तयार करून त्यानुसार सुसज्ज ऑपरेशन थिएटर उभारणो सक्तीचे केले जाईल. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने टेलिमेडीसीनची योजना जाहीर केली होती. सत्ता आल्यास त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. दुर्गम भागातील एखाद्या रुग्णाचे अहवाल शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी स्क्रीनवर पाहून वैद्यकीय सल्ला देण्याची ही योजना अमलात आणण्यात येईल.
प्रश्न - विरोधी बाकावर बसलेले असताना खासगी हॉस्पिटलच्या मनमानीला वेसण घालण्याची मागणी सतत करीत होता. आता काय करणार?
डॉ. सावंत- खासगी हॉस्पिटल्सच्या मनमानीला निश्चित वेसण घातली जाईल आणि सामान्यांना दिलासा दिला जाईल. खासगी हॉस्पिटल्सचे दर नियंत्रित करण्याचे अधिकार सरकारला नसले तरी सामान्यांवर त्यांच्याकडून अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या हॉस्पिटल्सकडून औषधांचे आकारले जाणारे दर नियंत्रित केले जातील.
प्रश्न - जेनरिक औषधांच्या पुरवठय़ाबाबत शिवसेना कायम आग्रही राहिली. त्या दिशेने कोणती उपाययोजना करणार?
डॉ. सावंत- काही थोडी अँटीबायोटीक्स सोडली तर जेनरिक स्वरुपात बहुतांश औषधे उपलब्ध आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात जेनरिक औषधे उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. लोकांना स्वस्त दरातील जेनरिक औषधे उपलब्ध करून देण्यास शासन कटीबद्ध आहे.
4