लोकसभा निवडणूक झाली असून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबईत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या वेळी जागावाटपावरून झालेल्या कोंडीला वाचा फोडतानाच विधानसभेच्या जागावाटपाचीही ठिणगी टाकली आहे.
लोकसभा निवडणुकीत २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे.
आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर ८०-९० जागा मिळाल्या तर ५०-६० निवडून येतील. आता ५० आहेत म्हणजे आम्ही ५० जागा घेऊ असे होणार नाही. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून अशी मागणी भुजबळ यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चारच जागा सुटल्या होत्या. पैकी दोन जागांवर मित्र पक्षातून उमेदवार आयात करावे लागले होते. तर नाशिकची जागा भुजबळांना देण्याचे भाजपने मान्य केले असताना शिंदे गटाने हक्क न सोडल्याने भुजबळांनी नाईलाजाने ही जागा सोडली होती. यामुळे महायुतीतील तिढा सुटत नव्हता. तर साताऱ्याची जागा भाजपाने राष्ट्रवादीकडून काढून घेतली होती. याचे पडसाद आता विधानसभेच्या जागावाटपावेळी उमटण्याची शक्यता आहे.