पंढरीनाथ कुंभार ल्ल भिवंडीआंध्र सरकारने राज्यातील तेलंगणा भागात राहणाऱ्या विणकरांना प्रोत्साहन न दिल्याने ते राज्याबाहेर गेले आहेत. मात्र, आता स्वतंत्र तेलंगणा राज्य झाल्याने तेलंगणा सरकारने गुजरात व महाराष्ट्रातील तेलुगू कापड विणकर व व्यावसायिकांना ‘घर वापसी’ची हाक दिली आहे. त्यांनी खासदार, आमदार व अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे़ या वस्त्रोद्योग समितीने भिवंडीत दोन दिवस मुक्काम करून त्या भागातील यंत्रमाग व तेलुगू वसाहतींचे निरीक्षण केले. आंध्र प्रदेशाचे विभाजन झाल्यानंतर तेलंगणा राज्य स्थापन झाले. तेलंगणातील विस्थापित झालेले नागरिक राज्यात परतावेत, इतर राज्यांतील त्यांचे उद्योगधंदेदेखील तेलंगणांत स्थलांतरित करावेत या उद्देशाने तेलुगू नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. तेलंगणा वस्त्रोद्योग विभागाच्या शिष्टमंडळाने गुजरातमधील सुरत व भिवंडीत दोन दिवस मुक्काम करून त्या भागातील यंत्रमाग व तेलुगू वसाहतींचे निरीक्षण केले. तेलंगणात शेती, जागा आदी मालमत्ता असलेले अनेक तेलंगणावासी भिवंडीत राहत आहेत. शहरातील पद्मानगरमध्ये ‘अखिल पद्मशाली समाज मंगल हॉल’मध्ये ‘आॅल इंडिया पद्मशाली संघा’च्या (हैदराबाद) पॉवरलूम विभागांतर्गत शहरातील पॉवरलूम व्यापारी, कामगार, डिझायनर, मास्टर तसेच तेलंगणावासीयांची सभा झाली. या सभेत तेलंगणा सरकारच्या शिष्टमंडळातील खासदार कडियम श्रीहरी, आमदार वर्धन्ना पेट्टा, आरूरा रमेश, परकाला, चल्ला धर्मा रेड्डी, सल्लागार बी.व्ही. पापाराव, वस्त्रोद्योग आयुक्त जयेश रंजन यांनी मार्गदर्शन करून समस्त कापड उद्योजकांना तेलंगणात स्थलांतरित होण्यासाठी आवाहन केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी कापड व्यवसायासाठी सर्व सुविधा देऊन टेक्सटाइल पार्कसारख्या योजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे नुकसान : सध्या भिवंडी शहरात एकूण सात लाख यंत्रमागांपैकी तीन लाख यंत्रमाग तेलुगू व्यावसायिकांचे आहेत. कॉटन मार्केटमध्ये त्यांचे वर्चस्व आहे. असे असताना तेलंगणात हे मार्केट स्थलांतरित झाले तर भिवंडीसह राज्य शासनाला त्याचा चांगलाच फटका बसेल, असे जाणकार व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.
तेलुगू व्यावसायिकांना ‘घर वापसी’ची साद
By admin | Published: January 11, 2015 1:17 AM