पुणे : कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ जळगाव जिल्ह्यात तुकाराम सांडू पाटील (३२, कन्हेरे, ता. पारोळा) आणि भगवान कांशीराम गुरव ( ५९, ह.मु. शहापूर ता. जामनेर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी तापमान पुणे येथे १७़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़देशभरात पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी अद्याप उष्णतेची लाट कायम आहे़ त्याचाच परिणाम म्हणून पारा पुन्हा एकदा वाढला आहे. विदर्भातील बहुतांश शहरातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे आहे़ महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात एप्रिल ते जूनपर्यंतचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे़ त्यामुळे या भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता ४७ टक्के असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे़ २०१६ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते़ यंदाचे वर्षही उष्ण राहणार असल्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
राज्यभरात तापमानाचा पारा पुन्हा वाढला; जळगावात दोघांचा बळी
By admin | Published: April 06, 2017 4:03 AM