लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पुणे/नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, उन्हाचा पाराही कमालीचा वाढला आहे. राज्यभरात कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मुंबईत उकाडा कायम आहे.
रविवारी राज्यात सोलापूर आणि अकोल्यात उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सोमवारपासून विदर्भ, मराठवाड्यातील उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (यलो अलर्ट) इशाराही हवामान विभागाने दिला. दरम्यान, देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम आहे.
लोकसभा निवडणुकीचे अद्याप पाच टप्पे बाकी असताना वाढत्या उष्णतेचा परिणाम त्यावरही दिसत आहे. मे महिन्यात देशातील १५ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत असल्याचा इशारा आयएमडीचे महासंचालक डॉ.एम. महापात्रा यांनी दिला आहे.
विदर्भासाठी मे 'ताप'दायकnमे महिन्याचा पहिला आठवडा विदर्भवासीयांसाठी अत्यंत ‘ताप’दायक ठरला आहे. एप्रिलमध्ये काहीसा दिलासा देणारा सूर्य मे मध्ये आग ओकत आहे. सर्वाधिक ४४.४ अंशांची नोंद झालेल्या अकोल्यानंतर चंद्रपूर, वर्धा शहरातही पारा ४४ अंशांवर गेला. nयावर्षी नागपूरचा पारा पहिल्यांदा ४३ अंशांवर पोहोचला आहे. नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असून रविवारी अक्षरश: अंगाची होरपळ होत असल्याचा अनुभव लोकांना आला.
पुढील पाच दिवस तापणारहवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऊन असेच वाढत राहिल्यास तापमान त्यापुढेही जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यूपारोळा (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने रविवारी एका शेतकऱ्याचा मृत्यू घेतला. अर्जुन भगवान पाटील (६८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अर्जुन हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. बांधावर काम करताना चक्कर येऊन ते कोसळले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
राज्यात सोमवारपासून विदर्भातील ११ जिल्ह्यांत तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसह ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पारा वाढणार आहे. - माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ