मुंबई / नागपूर : फेब्रुवारीचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असे वाटत असताना सोमवारी पुन्हा एकदा पारा ९.२ अंशांपर्यंत घसरल्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी भरली. नाशिक ९.२, तर नागपूर, पुण्यात नवीन वर्षातील सर्वात नीचांकी ९.४ किमान तापमान नोंदल्याने नागपूर, पुणे, नाशिककर पुरते गारठून गेले.नागपुरात तब्बल ४८ दिवसांनंतर पारा एवढा खाली आला. बोचऱ्या थंडीमुळे कपाटात गेलेली स्वेटर्स आणि मफलर्स परत बाहेर निघाली आहेत. शनिवारपर्यंत रात्री व पहाटे काही प्रमाणात गारवा वाढला होता. मात्र, रविवारी सायंकाळनंतर थंडीमध्ये वाढ झाली. सोमवारी पहाटे पारा आणखी घसरला. नाशिक हे राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान असलेले शहर म्हणून नोंदविले जात आहे. रविवारी १०, तर सोमवारी थेट ९.२ अंशांवर पारा घसरला. जानेवारीपेक्षा फेब्रुवारी ‘कूल’ सर्वसाधारणपणे जानेवारीत बोचरी थंडी जाणवते. मात्र, यंदा जानेवारीत महिनाभर किमान तापमान हे १० अंश सेल्सिअसहून अधिकच होते. फेब्रुवारीत तुलनेने जास्त थंडी जाणवत आहे.प्रमुख शहरांतील किमान तापमान बारामती १०.१, सातारा १४, महाबळेश्वर १२.४, नाशिक ९.२, जेऊर १०, परभणी ११.३, नांदेड १२.३, औरंगाबाद १०.५, जालना १२.४, सांताक्रुझ १८, मुंबई २१.२, ठाणे १९, डहाणू १६.९, माथेरान १७.८, अकोला १०.८, अमरावती ११.२, बुलडाणा १३.३, ब्रह्मपुरी १०.३, चंद्रपूर ११.२, गडचिरोली १०.६, गोंदिया १०.५, नागपूर ९.४, वर्धा १०.९, वाशिम १६.८, यवतमाळ १३.
महाराष्ट्रात पुन्हा हुडहुडी; नाशकात नीचांकी ९.२ तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 4:02 AM