मुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत असून, मुंबईचे किमान तापमान सातत्याने वरखाली होत आहे. २० ते २१ अंशावर मुंबईचे किमान तापमान नोंदविण्यात येत असून, राज्याच्या काही भागांतही किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुंबई आणि आसपासचा परिसर ढगाळ राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. १९, २० नोव्हेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहील. २१, २२ नोव्हेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २१ अंशाच्या आसपास राहील.गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
राज्यासह मुंबईत तापमानाचे हेलकावे; कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:09 AM