ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.11 - पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त फुलांची आरास करण्याचा मान डोंबिवलीकर विठ्ठल मोरे यांना मिळाला आहे. एकादशीचा मुख्य सोहळा शुक्रवारी असून गुरूवारी मोरे यांनी विठ्ठल आणि रूक्मिणीच्या मंदिर व गाभा-याला केलेली फुलांची आरास पाहून भाविकही मंत्रमुग्ध झाले.
याबाबत मोरे यांनी सांगितले की, राज्यासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून लाखो भाविक पंढरपूरला रवाना झाले आहेत. मात्र थकलेल्या भाविकांनी प्रफुल्ल मनाने विठुरायाचे दर्शन घ्यावे, असे मनोमन वाटत होते. पांडुरंगाची सेवा करण्याची इच्छा असल्याने विठ्ठल आणि रूक्मिणी मंदिराच्या सजावटीसाठी मंदिर समितीकडे परवानगी मागितलली होती. समितीनेही मागणी मान्य करून शुक्रवारी होणा-या मुख्य सोहळ््याआधी फुलांची आरास करून सेवा करण्याची संधी दिली. त्यानुसार गुरूवारी विठ्ठल मंदिरातील सोळखांबी, चौखांबी व विठ्ठल गाभारा, रूक्मिणी मातेकडील चौखांबी व गाभारा आणि परिवार देवतांना फुलांनी सुशोभित केले.
पांडुरंगांच्या सेवेचा मान आपल्यालाही मिळावा, असे आवाहन मोरे यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने केले. त्याला मोरे यांनीही होकार दिला. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे, गणेश मोरे, प्रविण मोरे, विष्णु जाधव, सुर्यकांत गायकवाड, गजानन गायकवाड, विठ्ठल चौधरी, रेखा मोरे, शशिकांत गायकवाड, डोंबिवली मित्र मंडळ, पिंपळवाडी ग्रामस्थ मंडळ अशा नातेवाईकांपासून मित्रपरिवाराने मोरे यांना सेवेत सहकार्य केले. मोरे यांनी केलेल्या नयनरम्य सजावटीचे मंदिर समितीने कौतुक केले. शिवाय मोरे यांना पत्र पाठवून पुढील वर्षीही सजावट करण्याचे आवाहन केले आहे.