पुणे : महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचरणी घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, यतीश रासने, उल्हास भट, राजेंद्र घोडके, रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते. सकाळी १० वाजता भागवत यांचे गणपती मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाची सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. अभिषेकाचे पौरोहित्य करणा-या मिलींद राहुरकर गुरुजांनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली. ------------------श्री विघ्नहर्त्याच्या उपासनेतून कष्ट, विघ्न दूर व्हावेत, संस्कार करावेत अशा प्रकारच्या औचित्यपूर्ण दिशेने चाललेले दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कार्य पाहून आनंद वाटला. समाजाची धारणा करणारा धर्म हाच आहे. आत्मसाधना व लोकसेवा या दोन्हींचे परिपूृर्ण केंद्र यातून आपले मंदिर बनावे असा लेखी शुभेच्छा संदेश त्यांनी अभिप्राय म्हणून गणपती सदन येथे दिलेल्या भेटीदरम्यान दिला.
रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 6:48 PM
दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
ठळक मुद्देदगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे दर्शन