डोंबिवली : डोंबिवलीतील गणेश मंदिर, स्वामी नारायण मंदिर आणि शहाडचे बिर्ला मंदिर उडवून देण्याची धमकी आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने या तिन्ही मंदिरांची पाहणी केली. श्वानपथकांच्या मदतीने संपूर्ण मंदिर परिसर पिंजून काढला. मंदिरांमध्ये अचानक तपासणी मोहीम सुरू झाल्याने भाविकांत एकच खळबळ उडाली. मंदिरांना धमकी आली नसली, तरी दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्याकडील माहितीनुसार ही तपासणी केली आणि सुरूवातीला त्याची कल्पना स्थानिक पोलिसांनाही नव्हती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तपासणी करीत आहोत, एवढे मोघम उत्तर तपासणी करणाऱ्यांनी मंदिर प्रशासनांना दिले. डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिर परिसरात बॉम्बशोधक तपासणी पथक आणि श्वान पथकाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण होते. अधिकारी मात्र दिवसभरात तपासणीबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हते. मंदिराच्या विश्वस्तांनी मात्र अधिकृतरित्या माहिती देण्यास नकार दिला असला तरी तपासणी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.कल्याणमधील तीन तरूण ‘इसीस’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांचा म्होरक्या मुंब्य्रातून काम करत असल्याचे गेल्यावर्षी उघड झाले होते. त्या आधारे सतत सुरू असलेल्या माहितीच्या आदान-प्रदानातून दहशवादविरोधी पथकाला जी गुप्त माहिती मिळाली, त्यानुसारच त्यांनी ही तपासणी करून सुरक्षेबाबत मंदिर प्रशासनांना काही सूचनाही केल्याचे समजते.कल्याण-डोंबिवलीतील काही प्रसिद्ध मंदिरे उडवून देण्याची धमकी आली आहे का, असे विचारता पोलिसांनी त्याबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. मात्र मंदिरांना सुरक्षा कडेकोट करण्याच्या सूचना दिल्याचे मान्य केले. (प्रतिनिधी)मंदिरांबाहेर वाहने उभी करण्यास मनाई>गणेश मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले, की मंदिरांत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून गरज पडल्यास ही सुरक्षा यंत्रणा अधिक चोख केली जाईल. मंदिरांबाहेर कोणतीही वाहने उभी करण्यास सक्त मनाई केली असून गरज पडल्यास फेरीवाल्यांनाही तेथून हटवण्याचा विचार सुरु आहे.त्याबाबत पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्यास पालिकेच्या मदतीने हा निर्णय अंमलात आणला जाईल. अनोळखी व्यक्तींवर कडक नजर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मंदिरांना अतिरेक्यांचा धोका?
By admin | Published: May 19, 2016 3:26 AM