घारगाव ( जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पूणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज पहाटे टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याने द बर्निंग टेम्पो थरार येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला. महामार्ग पोलिसांनी धाव घेतली असून टेम्पो विझविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जात होता. महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक - पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ हा पुण्याकडे जात असताना पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. या अचानक लागलेल्या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. नाशिक - पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे.
घटनास्थळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख घटनास्थळी हजर होते . संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली आहे. महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर होते. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत असल्याचे समजले असून या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोहचले.