मुंबई : पुण्यातील विमाननगर येथील सुमारे हजार बेकायदेशीर बांधकामांना तात्पुरते अभय मिळाले आहे. ८ आॅगस्टपर्यंत ही बांधकामे न पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पीएमआरडीएला बुधवारी दिले.पुण्यातील विमान नगरमध्ये २००३ च्या एअरफोर्स अधिसूचनेचे उल्लंघन करून हजारहून अधिक बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली. ही सर्व बांधकामे प्रतिबंधात्मक परिक्षेत्रात उभारण्यात आल्याने गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला.त्यानुसार पीएमआरडीएने एमआरटीपी कायद्यांतर्गत येथील रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली. या नोटीसला सुमारे ४० रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, इमारती प्रतिबंधात्मक परिक्षेत्रात उभारण्यात आल्या नाहीत. तसेच या सर्व इमारती २००० पूर्वी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार या इमारतींवर कारवाई केली जाऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने ८ आॅगस्टपर्यंत या याचिकांवरील सुनावणी तहकूब केली. मात्र तोपर्यंत या इमारतींवर कारवाई न करण्याचा आदेश पीएमआरडीएला दिला. (प्रतिनिधी)
पुण्यातील हजारहून अधिक बांधकामांना तात्पुरता दिलासा
By admin | Published: June 23, 2016 4:14 AM