मुंबई : नांदेड येथील बालगृहातून दीड वर्षांच्या मुलाला विकत घेतल्याचा आरोप असलेल्या दाम्पत्यालाच उच्च न्यायालयाने बुधवारी संबंधित मुलाचा तात्पुरता ताबा दिला. या दाम्पत्याने त्याला एक लाख ९० हजार रुपयांना विकत घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.ताडदेव पोलिसांनी भारतीय दंडसंहिता ३७० (१) अंतर्गत संबंधित दाम्पत्यावर गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.याचिकेनुसार संबंधित दाम्पत्याचा विवाह होऊन १० वर्षे उलटून गेली तरी त्यांना मुल झालेले नाही. त्यामुळे मुल दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या एका मैत्रिणीने मुल दत्तक घेण्यासाठी नांदेड येथील बालगृहाचे नाव सुचवत तेथे काम करणाऱ्या एका महिलेचे नाव व नंबर दिला. संबंधित दाम्पत्याने जून २०१४ मध्ये नांदेड येथील बालगृहाला भेट दिली. चौकशी केल्यानंतर बालगृहातील कर्मचारी महिलेने त्यांना मुल दत्तक घेण्यासाठी एक लाख ९० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी मागितलेली रक्कम भरल्यानंतर त्यांच्याकडे दहा दिवसांचा मुलगा सोपवण्यात आला. दत्तक प्रक्रिया पूर्ण न करताच या दाम्पत्याने मुल विकत घेतल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याला देण्यात आली. या माहितीनुसार पोलिसांनी याचिकाकर्त्यांवर गुन्हा नोंदवला आणि मुलाला अनाथाश्रमात टाकले. याचिकाकर्त्यांचा व सरकारचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने संबंधित मुलाचा ताबा नऊ महिन्यांकरिता याचिकाकर्त्यांकडे देण्याचे निर्देश दिले. ‘या नऊ महिन्यांत याचिकाकर्त्यांनी मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रिया पार पाडावी किंवा स्वत:ला त्याचे अधिकृत पालक म्हणून जाहीर करण्यासाठी पावले उचलावीत,’ असे निर्देश खंडपीठाने दिले.‘केवळ मुलाच्या हितासाठी आम्ही याचिकाकर्त्यांना त्याचा तात्पुरता ताबा देत आहोत,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने महिला पोलिसांना व सामाजिक सेवा कक्षाच्या महिला अधिकाऱ्याला मुलाची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे की नाही, हे पाहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
‘त्या’ दाम्पत्यालाच मुलाचा तात्पुरता ताबा
By admin | Published: September 29, 2016 3:57 AM