मुंबई : २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्धच्या खटल्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरती स्थगिती दिली.अबू जुंदालला अटक केल्यानंतर त्याच्या सौदी अरेबिया ते भारत या प्रवासाचर कागदपत्र अबू जुंदालच्या वकिलांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून मागितली. मात्र, पोलिसांनी ते देण्यास नकार दिल्याने बचावपक्षाच्या वकिलांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने पोलिसांना कागदपत्रे बचावपक्षाला देण्याचा आदेश दिला. त्याला दिल्ली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी ११ जून रोजी ठेवली. परंतु, अबू जुंदालविरुद्ध विशेष न्यायालयात सुरू खटल्याला तात्पुरती स्थगिती दिली.सौदी अरेबिया सरकारने जुंदालचा ताबा दिल्ली पोलिसांना दिला. विमानात त्याच्याबरोबर तीन पोलीस असल्याचे बचावपक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी जुंदालच्या प्रवासाची कागदपत्रे द्यावीत अशी मागणी बचावपक्षाच्या वकिलांनी केली. एअरवेजने पोलिसांना कागदपत्रे दिल्याचे सिद्ध झाल्यास तपास यंत्रणेने जुंदालकडून कागदपत्रे जप्त केल्याचा दावा फोल ठरेल, असा युक्तिवाद बचावपक्षाच्या वकिलांनी केला. त्यावर विशेष न्यायालयाने दिल्ली पोलिसांना बचावपक्षाच्या वकिलांना कागदपत्रे देण्याचा आदेश दिला. तो रद्द करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना हिंदी शिकविल्याचा व हल्ल्यावेळी पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना सूचना दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.तपास यंत्रणेचा दावा खोटातपास यंत्रणेने अबू जुंदालला सौदी अरेबियावरून अटक करून देशात आणले. त्याचवेळी त्याच्याकडून त्याचा पाकिस्तानचा पासपोर्ट व अन्य कागदपत्रे जप्त केल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे बचावपक्षाचे म्हणणे आहे.
अबू जुंदालविरुद्धच्या खटल्याला तात्पुरती स्थगिती- उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:25 AM