- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर आणि विदर्भातील गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राज्यातील इतर दहा जिल्हे मात्र अजून कोरडेच आहेत.औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अकोला, जालना, यवतमाळ या नऊ जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीच्या २६ ते ५० टक्केच पाऊस झाला असून सोलापूर जिल्ह्यात २५ टक्केही पाऊस झालेला नाही. राज्यात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या लागवडीत सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून त्याखालोखाल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यातील धरणांमध्ये ३४.७४ टक्के साठा असला तरी तो गेल्यावर्षी आजच्या तारखेपेक्षा तीन टक्के अधिक आहे. राज्यात १ जून ते १९ जुलैअखेर १८२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ७३.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या १०८.५ टक्के एवढा झाला होता. ठाणे, रायगड, पालघर, पुणे, गडचिरोली या पाच जिल्ह्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, वर्धा, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस; धुळे, जळगांव,अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून १४ जुलैअखेर १०१.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तसेच कोकण, कोल्हापूर, पुणे विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. यामध्ये कापसाची ३५.५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्याखालोखाल तेलबिया (३१.६७ लाख हेक्टर) आणि तृणधान्याची (१७.२५ लाख हेक्टर ) पेरणी झाली आहे.
दहा जिल्हे अजून कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:40 AM