ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - टेमघर धरण गळती प्रकरणी जलसंपदा विभागाने एकाचवेळी मोठी कारवाई करत १० अभियंत्यांना निलंबित केले आहे. टेमघर धरणातून मोठया प्रमाणावर गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली.
त्यात कंत्राटदारासह २५ अभियंते दोषी असल्याचे समोर आले. १५ अभियंते सेवानिवृत्त झाल्याने उरलेल्या १० जणांना तात्काळ निलंबित करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: जाऊन धरणाची पाहणी केली. त्यानंतर ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने टेमघर धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडणे शक्य नसल्याने हे धरण डिसेंबर पर्यंत हे धरण दूरूस्तीसाठी रिकामे करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
या धरणाची क्षमता ३.८१ टीएमसी असून सध्या धरणात ९० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे गळती रोखण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा कमी केला जाणार असून तो २.३१ ते २.८१ इतका पाणी साठा शिल्लक ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. टेमघर धरणातून तब्बल ६०० लिटर पाण्याची प्रतिसेकंद गळती होत आहे. सेकंदांचा हिशोब मांडला तर ते फारसे काही विशेष वाटत नाही.
ही गळती दिवसांमध्ये मोजल्यास एका दिवसाचे ८६,४०० सेकंद म्हणजे दिवसाला ५,१८,४०,००० याचा अर्थ दिवसाला पाच कोटी अठरा लाख चाळीस हजार लिटर पाण्याची गळती होते. एका महिन्याचा हिशेब मांडला तर एकशे पंचावन्न कोटी बावन्न लाख लिटर पाण्याची गळती होत आहे.