मुंबई : पक्षप्रवेशावेळी दिलेले एकही आश्वासन काँग्रेसने पाळले नाही. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची कारवाई करण्यात आली. जी मंडळी या कारवाया करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे सांगतानाच येत्या नवरात्रीतच या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी रविवारी स्पष्ट केले.राणे यांची भाजपाशी वाढलेली जवळीक लक्षात घेत; काँग्रेसने राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. या निर्णयामुळे संतप्त झालेले राणे म्हणाले, कोणतीही माहिती न देता ही नेमणूक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे हे षड्यंत्र आहे. या दोघांनी काँग्रेस संपवायचे काम चालविले आहे. सिंधुदुर्गात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व सत्ता काँग्रेसकडे आहे. राज्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असणारा सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे. ज्यांनी ही सत्ता मिळवून दिली अशा पदाधिका-यांना घरी बसविण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप राणे यांनी केला.मी काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण वगैरे नेते कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना मी नको आहे. मी यशस्वी होईन याची त्यांना धास्ती वाटते. नांदेडमध्ये काँग्रेस संपली, आता राज्य काय सांभाळणार, असा टोलाही त्यांनी लगावला. शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात चार वर्षांपासून काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे पद रिक्त आहे. तेथे नेमणूक करायला अशोक चव्हाणांना फुरसत नाही. सोमवारी मी सिंधुदुर्गात जात आहे. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील कार्यक्रम ठरवू. परंतु, सध्या जे काही सुरू आहे त्याचा नवरात्रीत सोक्षमोक्ष लावू, असे राणे यांनी स्पष्ट केले.>नातवाच्या वाढदिवसाला..राणेंच्या नातवाचा नवरात्र उत्सवात वाढदिवस असतो. त्या दिवशीच राणे काँग्रेसला ‘रामराम’ ठोकणार आहेत.
दस-यापूर्वी सीमोल्लंघन, ‘त्यांना’ जागा दाखवून देईन - नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:39 AM