मुंबई : वीज मीटरचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एका भामट्याने महावितरणला तब्बल १ कोटी ८९ लाखांना चुना लावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे.महावितरणाला भांडुप विभागीय कार्यालयाकडून वीज मीटरचे रीडिंग घेण्याचे कंत्राट व्हीजन इन्फोटेक आणि ऋतुराज एंटरप्रायझेज या दोन कंपन्यांना मिळाले होते. याच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वीज मीटरच्या घेतलेल्या फोटोंमध्ये फेरफार करून ठगीचा व्यवसाय करण्याची योजना व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेल्या राजू ऊर्फ श्रीधर ऊर्फ हरिओम कृष्णमूर्ती अय्यर (४०) याने आखली. आपल्या घरामधून ठगीचा व्यवसाय करणाऱ्या अय्यरने गेल्या चार महिन्यांत ४०० हून अधिक ग्राहकांंच्या वीज मीटरच्या बिलामध्ये फेरफार करून तब्बल १ कोटी ८९ लाख ७२ हजार ४४८ रुपयांंचा गंडा महावितरणाला घातला आहे. ही बाब महावितरण कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. व्यवसायाने इलेक्ट्रिशयन असलेला अय्यर ठाणे येथील श्रीनगर परिसरात राहतो. इलेक्ट्रिशियन असल्याने वीज बिल जास्त येत असल्याच्या तक्रारी आणि ते कमी करण्यासाठी ग्राहक त्याच्या सहज संपर्कात येत होते. भरमसाठ वीज बिल येणाऱ्या ग्राहकांना फोन करून तो व्यवसाय करीत होता. (प्रतिनिधी)
सूत्रधारासह दहा जणांना अटक
By admin | Published: April 02, 2015 5:05 AM