ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बुधवारी रात्री ‘हे राम नथुराम’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी गोंधळ घालून, प्रयोग बंद पाडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज राजपूरकर यांच्यासह १० जणांवर नौपाडा पोलिसांनी कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, शांतता भंग करणे, अशा कलमांखाली त्यांच्यावर कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी रात्री ८.३० वा.च्या सुमारास शरद पोंक्षे लिखित हे नाटक सुरू झाल्यानंतर, अर्ध्या तासाने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘गांधी हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है,’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नाटक बंद पाडले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. नौपाडा पोलिसांनी मध्यस्थी करून, राजपूरकर, मंड्या देशमुख, अभिजित पवार, अखिल चौधरी, अक्षय पाटील, मंगेश चौधरी, मालिनी भोजणे, जमना जाधव, जयश्री मोहिते आणि गीतांजली तांबे अशा १० जणांना अटक केली. नथुरामच्या विचारांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन केले. सुमारे १०० कार्यकर्त्यांनी तिकिटे काढून प्रवेश केला होता, परंतु आक्षेपार्ह संवाद आढळल्यामुळे, तीन वेळा हे नाटक बंद पाडल्याचे राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांना समज देऊन सोडून दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘हे राम नथुराम’प्रकरणी दहा जणांना अटक
By admin | Published: January 28, 2017 3:50 AM