ऑनलाइन लोकमत,देसाईगंज (गडचिरोली), दि. 12- ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज येथून नावेने देसाईगंज तालुक्याच्या सावंगी गावाकडे येताना नाव उलटल्याने १२ जण वैनगंगेत बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या १२ नागरिकांपैकी १० जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले असले, तरी दोन जण अद्यापही बेपत्ताच असल्याची माहिती आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज हे गाव चहूबाजूंनी नद्यांनी वेढलेले आहे. दरवर्षी पावसाळयात हे गाव पुराने वेढलेले असते. काही वर्षांपूर्वी या गावांतील काही नागरिकांचे नदीपलिकडील सावंगी गावानजीक पुनर्वसन करण्यात आले. परंतु जमीन सुपीक असल्याने अजूनही बरेचसे कुटुंब जुनी लाडज येथेच वास्तव्य करतात. तेथील नागरिकांना पावसाळ्यात बाहेर पडण्यासाठी नाव (डोंगा) हेच साधन असते.
मंगळवारी सकाळी लाडज येथून काही शाळकरी विद्यार्थ्यांसह १२ जण नावेने सावंगीकडे जाण्यास निघाले. मात्र नाव वैनगंगेच्या मध्यभागी येताच ती उलटली. यामुळे १२ जण पाण्यात बुडाले. काही वेळातच देसाईगंज पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. पोलीस प्रशासन व मासेमारांच्या सहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आले. बुडालेल्या दोघांचा शोध सुरु आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाचलेल्या नागरिकांची विचारपूस करुन प्रशासनाला योग्य सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे आदी उपस्थित होते. या सर्व नागरिकांना सावंगी येथील रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. रुग्णालयात जाऊनही आमदार क्रिष्णा गजबे यांनी नागरिकांची भेट घेतली.