ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 29 - बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह दहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे आयकर विभाग युनिट एक व आडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून ११ संशयितांकडून १़३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह आदी संशयितांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सात दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या सर्व संशयितांना पोलिसांनी गुरुवारी (दि.२९) जिल्ह्यात न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील अॅड. सुनीता चिताळकर यांनी बाजू मांडत गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी संशयित आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असून, संशयितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल असून, यांची साखळी, मोठी टोळी या बनावट नोटा छापण्याच्या गुन्ह्यामागे असू शकते असे न्यायालयापुढे सांगितले. यावेळी संशयितांच्या वकिलांनीही पोलीस कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. न्यायाधीश डिंपल देढीया यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत अकरा संशयितांच्या पोलीस कोठडीत येत्या २ जानेवारीपर्यंत वाढ केली.
छबू नागरेसह दहा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 9:04 PM