मुंबई : विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणा-या १०७ प्रकल्पास केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्ली येथे दिली. या मान्यतेमुळे प्रकल्पांसाठी पुढील दोन वर्षात उर्वरित दहा हजार कोटींचा निधी राज्याला प्राप्त होणार आहे.राज्यातील महत्त्वाच्या १०७ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारचे सहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर केला होता. त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्ली येथे वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर जेटली यांनी या प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नीति आयोगाच्या पदाधिका-यांशी देखील चर्चा केली.त्यानुसार या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात लवकरच करार करण्यात येणार आहेत. आजच्या चचेर्नुसार या प्रकल्पांसाठी लागणारे उर्वरित दहा हजार कोटींचे सहाय्य मिळणार असल्यामुळे पुढील दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
सिंचन प्रकल्पांना दहा हजार कोटी, १०७ प्रकल्पास केंद्र सरकारने दिली तत्त्वत: मान्यता : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 3:07 AM