ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 25 - भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या पिकअप व्हॅनला ट्रकची जोरात धडक बसून तब्बल आठ प्रवाशांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या व्हॅन चालकास जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण काळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २१ फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी बाराच्या सुमारास फुलंब्रीहून औरंगाबादकडे व्हॅन (क्रमांक: एमएच २०, ए टी ३०६९) निघाली होती. यात चालक संजय बाबूराव सपकाळ (रा. वसई) याने तब्बल ३५ प्रवासी बसविले होते. फुलंब्री रोडवर भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक: एमएच ०४, सी यू ५१३०) व्हॅनला जोराची धडक दिली. या अपघातातील सर्व ३५ प्रवाशांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ८ प्रवाशांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. व्हॅनचालकाने निष्काळजीपणे व्हॅन चालवल्यामुळे अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तपासी अंमलदार मिलिंद वाघमारे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब मेहेर यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यातील २ साक्षीदार फितूर झाले, तर चौघांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी चालक संजय सपकाळ याला भा.दं.वि. कलम २८९ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ३०४ (भाग-२) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, कलम ३०४ (अ) अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ३३७ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, कलम ३३८ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ४२७ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तर मोटार वाहन कायद्यानुसार २ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला १ ते ६ महिन्यांपर्यंतचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. पुराव्याअभावी ट्रकचालक राहूल हिरालाल सुरे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.