मुरलीधर भवार,
कल्याण- शहारातील गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले. दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचा करार झाला, पण दहा वर्षांनंतरही तो प्रकल्प रखडला आहे.प्रकल्प रखडण्यासाठी कंपनीला दोषी धरून पालिकेने त्यांना दर दिवशी पाच हजार रूपये दंडाची नोटीस बजावली आहे, तर कंत्राटदाराने प्रकल्प रखडण्यास पालिका जबाबदार असल्याचे खापर फोडत दंड भरण्यास नकार दिला आहे. या वादात प्रकल्प रखडल्याने आता नवा कंत्राटदार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतुकीसाठी कल्याण हे जंक्शन असल्याने भिवंडी बायपासहून दुर्गाडी येथे येणारा रस्ता, कल्याण-मुरबाड बाह्यवळण रस्ता, कल्याण-मुरबाड- माळशेजमार्गे नगर, कल्याण-बदलापूर-कर्जत, कल्याण-शीळ अशा वेगवेगळ््या रस्त्यांतील वाहतूक या शहरात एकवटते. जेएनपीटी बंदरातून शीळ-पनवेल मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होते. शिवाय एपीएमसी, स्थानिक बाजारपेठांतही ट्रक-अवजड वाहने येतात. त्यांच्यासाठी टर्मिनस व्हावे यासाठी २००५ मध्ये पालिकेने बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचा निर्णय घेतला. एसएम असोशिएट अॅण्ड बिल्डरची निविदा मंजूर झाली. दोन वर्षांत टर्मिनस बांधायचे आणि दहा वर्षे वापरायचे असे त्या करारात होते. ट्रक टर्मिनससाठी पालिकेने कंत्राटदाराला २८ हजार ३४० चौरस मीटरची जागा दिली होती. कंत्राटदार कंपनीने २४ महिन्यात ट्रक टर्मिनससह तेथे हॉटेल, व्यापारी गाळे, हॉस्पिटल, गोडाऊन आदी विकसीत करणे अपेक्षित होते. मात्र दहा वर्षांत ते झाले नाही. पालिकेनेही त्याकडे लक्ष दिले नाही. आता दंडाची नोटीस पाठवली आहे. मात्र पूर्वलक्ष्यी प्रभावाने दंड आकारता येत नसल्याने नोटिशीच्या तारखेपासून तो लागू होईल. >डम्पिंग हाच अडथळादिरंगाईचे खापर कंत्राटदाराने पालिकेवरच फोडले आहे. जागा उशिरा ताब्यात मिळाली, त्यामुळे कामाचे नियोजन करता आले नाही. शिवाय प्रकल्पाशेजारच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे मजूर पळून गेले, प्रकल्पासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने कोसळली, पालिकेने डम्पिंगच्या गाड्या प्रकल्पात घुसवल्या, त्यामुळे प्रकल्प मार्गी लावता आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.