ऑनलाइन लोकमत
इचलकरंजी, दि. 25 : सहा वर्षीय मुलीशी अनैसर्गिक कृत्य करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व तेरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. बबलू शौकत कलाल (वय ३६, मूळ रा. कराड) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मागील दहा महिन्यांत लैंगिक अत्याचार प्रकरणातील ही पाचवी शिक्षा आहे. त्यामुळे महिला वर्गातून न्याय प्रक्रियेचे अभिनंदन होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बबलू कलाल हा कराड येथील रहिवाशी असून, तो हातकणंगले येथील एका मटण दुकानात काम करीत होता. दुकान रात्री बंद करून तेथेच तो झोपत होता. २३ डिसेंबर २०१२ ते २१ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत त्याने संबंधित पीडित अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक कृत्य करीत होता.
तसेच बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला होता, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने २२ फेब्रुवारी २०१३ रोजी कराड पोलिस ठाण्यात दिली. सदरचा प्रकार हातकणंगले येथे घडल्याने हा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए.एन.संकपाळ यांनी तपास करून इचलकरंजी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी झाली. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे पंच, दुकानाचे शेजारी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार असे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांची साक्ष व सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश अस्मर यांनी लहान मुलीवर लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ प्रमाणे सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद, कलम ६ प्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, कलम ८ प्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन महिने साधी कैद, तसेच कलम १० प्रमाणे सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने एकूण दहा वर्षे सक्तमजुरी व सर्व कलमांतील मिळून तेरा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली आहे. कलालने केलेले हे कृत्य घृणास्पद व असामाजिक आहे.