संगीत ऐकायचे असेल तर मोगरीच्या सुवासाने घमघमलेल्या मैफलींना जाणे सोडाच, घराबाहेर पाऊलदेखील ठेवायची गरज नाही असा संगीत-कल्लोळ आजूबाजूला माजलेला असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून अभिजात मूल्य असणारे तरुण दमसासाचे ‘स्वर’ शोधून त्यांच्या पाठीवर दिग्गजांच्या आशीर्वादाचा हात ठेवण्याची दहा वर्षे... म्हणजेच ‘सूर ज्योत्स्ना’ या सदाबहार स्वर-मंचाचे पहिले दशक!संगीत हा ज्यांचा श्वास होता अशा स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्रसमूहाने निर्मिलेले हे व्यासपीठ गायन-वादनाच्या क्षेत्रातील तरुण प्रतिभेच्या आगमनाची पहिली ललकारी ठरावे, इतक्या नेमकेपणाने कार्यरत आहे. गेल्या दशकभरात ज्या तरुण कलाकारांच्या पाठीवर ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ची थाप पडली, त्यांची पुरस्कारानंतरची दमदार वाटचाल ही निवड किती कसोशीने केली जाते, याची निदर्शक म्हणता येईल.
ज्याच्या हाती स्मार्टफोन त्याच्या गळ्यात - कानात - हातात संगीत; अशा गजबजलेल्या वर्तमानात रिॲलिटी शो, रील्स आणि सोशल मीडियावरल्या तात्कालिक प्रसिध्दीच्या झगमगाटातून दीर्घकाळाच्या दमसासाची प्रतिभा शोधून काढण्याचे काम करणारे तज्ज्ञ परीक्षक हे ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारांच्या नेमकेपणाचे खरे रहस्य! पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. राजन-साजन मिश्रा, एल. सुब्रमण्यन, पं. हृदयनाथ मंगेशकर, शुभा मुदगल, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, पंकज उधास, कविता कृष्णमूर्ती आदी मान्यवरांनी सूर ज्योत्स्ना पुरस्कारांचे मानकरी ठरवण्यात आपला वेळ आणि आपले शब्द खर्ची घातले आहेत.
ख्यातनाम गायक रूपकुमार आणि सुनाली राठोड, संगीताचे दर्दी शशी व्यास - गौरी यादवाडकर आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांचे तयार ‘कान’ सतत नव्या आश्वासक स्वरांचा वेध घेत असतात... वर्षभर सतत चालणाऱ्या या प्रक्रियेतून निवड होते ती अभिजात भारतीय संगीताची परंपरा पुढे नेण्याची सांगितिक समज आणि तयारी असलेल्या तरुण कलावंतांची!- २०२२ च्या पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानाची संध्याकाळ यावर्षी बहरेल ती येत्या मंगळवारी, २१ मार्च रोजी, मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये!... त्या संध्याकाळी पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या उपस्थितीचा आशीर्वाद असेल आणि शंकर महादेवन यांच्या सळसळत्या ऊर्जेचा जल्लोष!... आणि हो, विजय दर्डा म्हणतात त्याप्रमाणे, त्या संध्याकाळी तिथे स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींची प्रसन्न, सुगंधी फुलेही असतील!