ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कामाची निविदा 16,000 कोटींची बोली लावून जीव्हीके या कंपनीनं जिंकली आहे, अशी माहिती सीएनबीसी-टीव्ही 18नं दिली आहे. या स्पर्धेत मुंबई विमानतळाचे संचलन करणाऱ्या जीव्हीकेने काही दिवसांपूर्वी सिडकोकडे निविदा दाखल केली होती. या स्पर्धेतून टाटा व्हिन्सीनं ऐन वेळी माघार घेतली होती. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर ही निविदा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होती. परंतु जीव्हीके कंपनीनं इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त बोली लावल्यानं ही निविदा जिंकली आहे. या निविदा प्रक्रियेला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 15 हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निविदा सादर करण्यासाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झ्युरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांकडून अंतिम आर्थिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. 9 जानेवारी 2017 ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती.
नवी मुंबई विमानतळ उभारणीची निविदा जीव्हीकेच्या खिशात
By admin | Published: February 13, 2017 6:18 PM