लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची, हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर आहे. भाजपच नाही तर अन्य दोन पक्षांमधील काही दिग्गजांना धक्का दिला जावू शकतो.
प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. शिंदे सरकारमध्ये २९ कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या-त्या पक्षाचे हेविवेट नेते होते. त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही. प्रत्येक पक्षातील तीन ते चार मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असे मानले जात आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यांपैकी तिन्ही पक्षांच्या १० ते १२ जणांना डच्चू दिला जावू शकतो. जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच म्हटले आहे.
कामगिरी चांगली असली तरी विभागीय संतुलन साधताना वेगळा निर्णय घेतला जावू शकतो असे संकेतही त्यांनी दिले होते. याचा अर्थ असाही लावला जात आहे की एखाद्या मंत्र्यांची कामगिरी चांगली असेल तरी विभागीय, सामाजिक संतुलन साधण्यास त्यांना वगळले जावू शकते.
विभागीय संतुलन, मराठा, बहुजन, मागासवर्गीयांना संधी, महायुतीला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य हे विस्तारासाठीचे महत्त्वाचे निकष असतील. फडणवीस हे अत्यंत सक्षम असे मुख्यमंत्री मानले जातात. तशीच आपली टीमही असावी असा त्यांचा प्रयत्न असेल. २०१४ मध्ये मंत्रिपदे देताना सक्षमता हा फारसा निकष नव्हता. यावेळी तो महत्त्वाचा निकष असेल असे मानले जाते.
प्रबळ दावेदारांची संख्या मोठीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर नवीन अध्यक्षपद कोणाला हा प्रश्न असेल. मंत्रिपदाची संधी देता आली नाही अशा पण फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले जावू शकते. विधानसभेचे अध्यक्षपद राहुल नार्वेकर यांना दिल्याने आपल्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यासाठी विधानसभाध्यक्ष करतात की काय अशी धाकधूक लागून असलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांना दिलासा मिळाला आहे. किमान १२ जिल्हे असे आहेत की जिथे महायुतीतीचे तीन ज्येष्ठ आमदार मंत्रिपदासाठीचे दावेदार आहेत. अशावेळी त्यातून एकाला संधी देताना कसरत होणार आहे.तीनपैकी दोघांना किंवा किमान एकाला तरी संधी नाकारली जाईल.गृह किंवा नगरविकास अशी दोन्ही खाती शिंदेसेनेला दिली जाणार नाहीत अशी चर्चा आता जोरात आहे. त्यांना महसूल खाते दिले जावू शकते. त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता असल्याचे म्हटले जाते.
फडणवीस आज दिल्लीत!भाजप मंत्र्यांच्या यादीला पक्ष नेतृत्वाची मंजुरी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली
जास्तीत जास्त मंत्री असतील?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सचिवांची बैठक सोमवारी घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि गतिशीलता या आधारेच आपले सरकार चालेल असे ते म्हणाले. सचिवांकडून अशा कारभाराची अपेक्षा करताना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात या तीन निकषांना अनुरुप असेच जास्तीतजास्त मंत्री असतील आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्यांना घेतले जाणार नाही अशी चर्चा कालपासून जोरात आहे. फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची यादी बर्यापैकी अंतिम केली असल्याचे समजते.
२० दावेदार
शिंदेसेनेला १२ मंत्रिपदे दिली जातील असे समजते. गेल्यावेळी मंत्री असलेले आणि मंत्रिपदाची संधी न मिळालेले असे किमान २० जण प्रबळ दावेदार आहेत.