मुंबई : एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने शनिवारी मध्यरात्री ट्रॉम्बे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. यात १५ पोलीस जखमी झाले असून हा हल्ला करणाऱ्या १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी एमआयएमचा नगरसेवक शहानवाज हुसेन याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला रविवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.ट्रॉम्बे परिसरातच राहणाऱ्या एका तरुणाने शनिवारी रात्री फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यामुळे एका समुदायाच्या भावना दुखावल्या. परिणामी संबंधितांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेतली व या प्रकरणी कारवाईची मागणी केली. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. मात्र या तरुणाला आमच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी या जमावाकडून करण्यात आली. पोलिसांनी यावर नकार देताच काहींनी या घटनेला हिंसक वळण देत पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या वेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. तसेच काहींनी पोलीस ठाण्यावर काचेच्या बाटल्यादेखील फेकल्या. या घटनेत १५ पोलीस जखमी झाले असून पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. शिवाय काहींनी पोलिसांच्या दोन वाहनांची तोडफोड केली असून, एक वाहन पेटवून दिले. (प्रतिनिधी)
आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव
By admin | Published: March 20, 2017 3:54 AM