महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 01:02 PM2024-08-18T13:02:49+5:302024-08-18T13:08:10+5:30
पुण्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
पुणे - जुन्नर येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणार असून या सभेपूर्वी महायुतीतील तणाव सगळ्यांसमोर आला. सभेपूर्वी अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांकडूनच काळे झेंडे दाखवण्यात आले त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जुन्नरच्या पर्यटनावरून स्थानिक भाजपा नेत्या आशा बुचके यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.
आशा बुचके म्हणाल्या की, आजपर्यंत महायुती अबाधित राहावी यासाठी आम्ही खूप सहन केले. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य होता. मात्र आता आमच्या गळ्याशी आलेले आहे. जुन्नर तालुक्यातील पर्यटनाच्या बैठकांना आम्हाला डावलण्यात येते. फक्त अतुल बेनके यालाच पुढे केले जाते. महायुतीत किती घटक पक्ष आहेत त्यांना ठाऊक नाही का? जुन्नर तालुक्यात तुम्ही पर्यटनाच्या चोरून बैठका घेता आणि स्वत:ला पालकमंत्री म्हणवता तुम्हाला पालकमंत्री म्हणवण्याचा अधिकार नाही असा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाजपा नेत्या आशा बुचके यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात #pune#ajitpawar#BJP#ncppic.twitter.com/sDCTfFaead
— Lokmat (@lokmat) August 18, 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संतप्त भूमिका
जुन्नरमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे दाखवले त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संतप्त भूमिका घेतली आहे. हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे मग त्यांनी निदर्शने काढण्याची काही गरज नव्हती. माझ्याही मतदारसंघात जेव्हा भाजपाचे मंत्री येतात, पदाधिकारी येतात तेव्हा आम्ही असा आक्षेप घेत नाही. त्यामुळे महायुतीच्या एकतेला गालबोल लावण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांना ताकीद देण्याचं काम वरिष्ठांकडून करावं. ही जनसन्मान यात्रा आहे. कुठल्याही गैरसमजातून असा प्रकार कुठल्याही घटक पक्षाने करू नये असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, जुन्नरमध्ये नक्की काय झालं याबाबत अजित पवारांना माहिती असेल कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते उत्तर देतील. अजित पवार स्वत: बोलतील असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितले. तर जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.