पिंपरी : कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध पिंपरीत फिर्याद दाखल केलेल्या अनिता रविंद्र साळवे यांच्याबद्दल फेसबुकवर (सोशल मीडिया) पिंपरीतील एकाने आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी सावळे यांनी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा शिक्रापूरला वर्ग करण्यात आला आहे. यातील आरोपी एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, भिडे यांच्या अटकेची मागणी होत आहे. अशातच फिर्यादी महिला सावळे यांच्याबद्दल पिंपरीतील तरूणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. काही वेळाने ही पोस्ट काढूनही टाकली. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत शनिवारी रात्रीच कार्यकर्त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठले.पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रविवारी सकाळी नेहरूनगर येथून महिला,कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटण्यास गेले. वरिष्ठ अधिका-यांना याबाबत माहिती देवून पुढील कार्यवाही केली जाईल. असे पिंपरीतील पोलीस अधिका-यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. दरम्यान भारिप बहुजन महासंघाने साळवे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना दिले आहे.
फेसबुकवर महिलेसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने पिंपरीत तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 2:47 PM