मुंबई : परीक्षेत काही आठवले नाहीतर, मी नापास झालो तर, मला अभ्यासातले काहीच आठवत नाही... असे कैक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. १२वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. पण करीयरचा तगादा लावणाऱ्या पालकांना घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती जात नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे, असे ‘टिस’च्या आयकॉलमधून सिद्ध झाले आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या मानवी पर्यावरण शाखेच्या वतीने फोनवरून ‘आयकॉल’ समुपदेशन चालते. यंदा या आयकॉल्सवर १२वीच्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. अभ्यासाविषयी त्यांच्या मनात शंका आहेत. त्याहूनही अधिक पालकांची करीअर सक्ती त्यांना त्रासदायक ठरते. त्यामुळे मन शांत करण्यासाठी मुले या हेल्पलाइनवर फोन करतात यावर तोडगा काढण्यासाठी आयकॉलतर्फे विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. विद्यार्थ्यांनी ताण न घेता अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी; शिवाय मनावरील करीअरचा ताण कमी कसा करावा, याचे मार्गदर्शन त्यांना करण्यात येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महिन्यागणिक ५०० ते ७५० फोन येत होते. आता ते एक हजारावर गेले आहेत आणि त्यात वाढ होत आहे, अशी माहिती आयकॉलचे समन्वयक पारस शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न : अभ्यासाची भीती, पालकांचे स्वप्न पूर्ण न करू शकण्याची भीती, अभ्यास लक्षात न राहण्याची भीती, नापास होण्याची भीती वाटते, दिलेल्या नोट्स पूर्ण वाचून होतील का?अमुक टक्के मिळायलाच हवेत, याच क्षेत्रात करीयर करायला हवे; नाहीतर भविष्य अंधारात आहे. अशी भीती घालून पालक विद्यार्थ्यांना अनेक शिकवण्या लावतात. पाल्याला काय हवे याचा विचार करीत नाहीत. - पारस शर्मा, आयकॉल समन्वयक
विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन
By admin | Published: February 14, 2016 1:40 AM