मुंबई : महायुतीसाठी रविवारचा दिवस घडामोडींनी भरलेला होता. एकीकडे महायुतीत तणाव वाढेल अशी घटना रविवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे घडली आणि त्यावरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, तर दुसरीकडे महायुतीचे तीनही प्रमुख नेते राज्यातील विविध भागात लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसले.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जुन्नरच्या नारायणगाव येथे आली होती. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी यात्रेला काळे झेंडे दाखवले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
जुन्नर पर्यटन आढावा बैठकीला आमंत्रित न केल्याने हे आंदोलन करत पवार व आ. अतुल बेनके यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांनी केली.
...तर बहिणींना मिळतील तीन हजार रुपये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाताऱ्यात आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. सरकार इथेच थांबणार नाही, सरकारची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सरकार बहिणींना दीडचे तीन हजार रुपये देईल.
मुंबईत ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून महिला ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या. महायुतीचे सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकणार नाही, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, लाडकी बहिण योजना पुढे चालू ठेवायची की नाही ते तुमच्या हातात आहे. तुम्ही लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल. लोकसभेसारखा दणका देऊ नका. लय वंगाळ वाटतं. समोरच्यांनी काय दिले? देवळातील घंटा दिली का? असेही ते म्हणाले.
राजेंद्र शिंगणे शरद पवारांबरोबर?अजित पवार गटातील आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मी नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो असे वक्तव्य त्यांनी वर्धा येथे एका कार्यक्रमात बोलताना केले. मात्र शिंगणे कुठेही जाणार नाहीत असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे.
आमच्याकडे पुण्यात जेव्हा भाजपचे कार्यक्रम होतात, तेव्हा त्यांचेच बोर्ड लागणार. आम्ही का अपेक्षा करावी की आमचे बोर्ड लावावे म्हणून?- अजित पवार, उपमुख्यमंत्री
तिथे निदर्शने करण्याचे कारण नव्हते. कुणी महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचे काम करत असतील तर त्यांना सक्त ताकीद दिली पाहिजे.- सुनील तटकरे, अजित पवार गट
अमोल मिटकरी, त्याचा जीव केवढा... तो सांगणार फडणवीसांनी खुलासा करावा, अशी वक्तव्य करणाऱ्यांना लगाम घातला पाहिजे. - प्रवीण दरेकर, भाजप.