मुंबई : बारावीपाठोपाठ आता दहावीची परीक्षादेखील लोडशेडिंगमुक्त होणार आहे़ दहावीची परीक्षा घेणाऱ्या एकाही केंद्रावर लोडशेडिंग झाल्यास राज्य शासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असा दमच उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला़येत्या ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे़ त्यामुळे या परीक्षा केंद्रांवर अखंड वीजपुरवठा होणार की नाही, अशी विचारणा न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने शासनाकडे केली़ त्यावर तूर्तास तरी २३१ केंद्रे असलेल्या विभागांत लोडशेडिंग होत आहे़ मात्र, अशा केंद्रांना जनरेटर दिले जाईल, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयात स्पष्ट केले़ त्यावर न्यायालयाने वरील दम दिला़ तसेच अशा परीक्षा केंद्रांना जनरेटर दिला की नाही याचा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर करा, असे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले़परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबईतील विष्णू गवळी यांनी केली़ त्यानुसार न्यायालयाने परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले होते़ त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गवळी यांनी पुन्हा शासनाच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली़ त्यावरील सुनावणीत न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)
दहावीची परीक्षाही होणार लोडशेडिंगमुक्त !
By admin | Published: February 25, 2015 2:41 AM