राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष २०२१ साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे, तर गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष २०२१ चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.
गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले. अन्नपूर्णा शिखरावर चढणारी प्रथम भारतीय महिला मोहिते या आहेत. यासह अन्य शिखरांवरही त्यांनी चढाई केलेली आहे.
दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी १२ खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ तर ३५ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ असे एकूण १० खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर करण्यात आले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील ५ खेळाडूंना जाहीर झाले होते. २ संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ची घोषणा करण्यात आली होती.