बारामती : सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानंतर बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील नीरा डावा कालव्यावरील ‘शंभरी’ ओलांडलेले पूल चर्चेत आले आहेत. या पुलांचा दर्जा तपासून वाहतुकीबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे; अन्यथा भविष्यात या पुलांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सावित्री नदीवरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पुलांची तपासणी चर्चेचा विषय बनला आहे. बारामती, इंदापूर तालुक्यांतील वाहनचालक याबाबत आग्रही आहेत. बारामती शहरात नीरा डावा कालव्यावर दोन ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलावरून सतत मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांची अधिक संख्या या वर्दळीमध्ये आहे. भविष्यात अनवधानाने होणारा अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलांचा दर्जा तपासण्याची शहरातील नागरिकांची आग्रही मागणी आहे. बारामती-इंदापूर रस्त्यावरील बांदलवाडी आणि पिंपळी येथे नीरा डावा कालव्यावर काही वर्षांपूर्वी नव्याने पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, दुहेरी वाहतुकीसाठी दोन्ही पुलांचा वापर होतो. याशिवाय, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील शेरपूल आणि सणसर बंगला येथील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी एकमेव आहे. या दोन्ही ठिकाणी पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याची गरज आहे. सणसर पाटबंधारे वसाहतीजवळील असणाऱ्या या पुलाचा संरक्षक कठडा अनेक वर्षांपासून कोसळला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहने नीरा डावा कालव्यात पडण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. याच पुलाच्या स्लॅबचे स्टील उघडे पडले आहे. त्यावरील खडी पडू लागली आहे. यामुळे हा पूल धोकादायक ठरण्याची भीती आहे. या पुलासह शंभरी ओलांडलेल्या सर्वच पुलांचा दर्जा तपासण्याची गरज आहे. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचा हा पालखी मार्ग आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या मार्गामुळे भविष्यात हे पूल पाडून नव्याने बांधकाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी सुरक्षित वाहतुकीसाठी या पुलांचा दर्जा उघड होणे आवश्यक आहे. >नीरा-मुर्टी मार्गावरील पूल बंद करणार...सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मिलिंद बारभाई यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, की आजच ब्रिटिशकालीन पुलांची पाहणी करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार परिसरातील ब्रिटिशकालीन पुलांची पाहणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली. परिसरातील पूल सुरक्षित आहेत. पुलांचे छायाचित्र, अवस्था आदी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येईल. नीरा-मुर्टी मार्गावरील जुना पूल बंद करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागातील पणदरे उपविभागाचे उपअभियंता योगेश सावंत यांनी सांगितले, की बारामती-नीरा मार्गावरील सोमेश्वरनगर, शेंडकरवाडी, जुना ढाकाळे पूल, कठीण पूल, माळेगावसह १० ते १२ ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल आहेत. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आली आहे. >१८९०च्या सुमारास नीरा डावा कालव्यावर विविध मार्गांवर रहदारीसाठी पुलांची निर्मिती झाली. दगड, चुनखडी, स्टीलचा वापर करून हे पूल बांधण्यात आले आहेत. १३०वर्षांपूर्वी वीर-भाटघर धरणातून नीरा डावा कालव्याची निर्मिती करून या परिसरात शेतीसाठी पाणी आणण्यात आले. आदर्श बांधकामांचा हे पूल नमुनादेखील असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, शंभर वर्षांनंतर या पुलांचा दर्जा आधुनिक शास्त्राद्वारे तपासण्याची वेळ आली आहे. १००वर्षे सर्वच ब्रिटिशकालीन पुलांनी ओलांडली आहे. त्या काळातील बांधकाम क्षेत्रातील प्रगत शास्त्र वापरून या पुलांची निर्मिती करण्यात आली आहे.
मुदत ओलांडली; आता दर्जा तपासा
By admin | Published: August 06, 2016 12:59 AM