विशेष प्रतिनिधी नागपूर : शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकºयांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज एकरकमी फेडल्यास दीड लाखाची कर्जमाफी देण्यात येते. हे वरचे कर्ज फेडण्याची मुदत ३१ डिसेंबर होती. ती आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. कर्जमाफी, बोंडअळी आदी शेतकºयांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बोंडअळी, तुडतुडा रोगाने झालेले नुकसान, दुष्काळासंदर्भात मदतीची घोषणा विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी करण्यात येईल.नागरी सहकारी बँकांनी दिलेले पीककर्ज हे माफीच्या कक्षेत आणण्याबाबत माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल. काही बहुभूधारक शेतकरी कर्जमाफीतून सुटले असतील तर त्यांना कर्जमाफी देण्याचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. २००८मध्ये यूपीएच्या काळात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत दिलेल्या कर्जमाफीत झालेले घोटाळे लेखा परीक्षणात समोर आले होते. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांमधून शिकूनच आम्ही पारदर्शक कर्जमाफी आणली आहे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, अब्दुल सत्तार, भाजपाचे संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केले.४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर -राज्यात आजच्या दिवशी एकूण २६ लाख शेतकºयांना २३ हजार ३०० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ६७ लाख अर्जदार शेतकºयांपैकी ४८ लाख शेतकºयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.काही साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या नावावर कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. त्यांनी या कर्जापोटी कॉर्पोरेट हमी दिली नसेल तर अशा कारखान्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:08 AM