अविनाश साबापुरे, यवतमाळराज्याचा शिक्षण विभाग देशात १८ व्या स्थानापर्यंत मागे असल्याचे तथ्य ‘असर’ अहवालाने उघड केले आहे. त्यातही शैक्षणिक प्रगतीमध्ये राज्यात प्रचंड प्रादेशिक असमतोल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे, कोकण विभागातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता ७० टक्क्यांच्या पुढे असून विदर्भात हेच प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही उणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने देशभरात सर्वेक्षण करून ‘असर’ अहवाल (अॅन्युअल स्टेट्स आॅफ एज्युकेशन रिपोर्ट) जाहीर केला आहे. १८ जानेवारीला हा अहवाल येताच शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांनी सर्वप्रथम विदर्भाचा दौरा केला. कारण एकीकडे देशपातळीवर महाराष्ट्राची शिक्षणविषयक कामगिरी सुमार असताना राज्यांतर्गत विदर्भातील जिल्ह्यांची गुणवत्ताही खूपच कमी आहे. अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात १८ व्या क्रमांकावर आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचा मजकूर वाचता येण्याची सरासरी ७२.५ आहे. राज्यांतर्गत विचार केल्यास पुणे विभागातील वाचनक्षम विद्यार्थ्यांची सरासरी ८३.३, तर अमरावती विभागात ही सरासरी अवघी ६५.७ आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचा मजकूर वाचता येण्याची सरासरी पुणे विभागात ८४.२, तर अमरावती व नागपूर विभागात केवळ ६७ आणि ६८ टक्के आहे. वाचन क्षमतेप्रमाणेच गणिताबाबतही राज्यात प्रादेशिक असमतोल आहे. अहवालानुसार, वजाबाकी करता येणाऱ्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पुणे विभागात ५५.९ टक्के आहे. मात्र, अमरावती विभागात हे प्रमाण फक्त २९.९ टक्के आहे.नागपूर विभागही ३८ टक्क्यांतच समाधानी आहे. भागाकार करता येणाऱ्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खुद्द पुणे विभागातही ३८ टक्केच आहे. तर अमरावती व नागपूर विभाग येथेही २६ टक्क्यांवरच अडकले आहेत.
शैक्षणिक प्रगतीत राज्यात प्रचंड प्रादेशिक असमतोल
By admin | Published: February 11, 2017 3:19 AM