रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर, दि. १७ - सध्या गाजत असलेला दहशतवादाचा प्रश्न अन् कोपर्डी घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर आगार अॅलर्ट झाले असून, सोलापूरसह जिल्ह्यातील ९ बसस्थानक आणि १० कंट्रोल पॉर्इंट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात येणार आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठीच्या येणाऱ्या खर्चास निधी मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरले. दहशतवाद आणि छेडछाडविरोधी पथक आता बसस्थानकावर जनजागरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी अतिरेकी लक्ष्य बनवतात. त्यातच कोपर्डी घटनेनंतर महिला, युवतींची सुरक्षा धोक्यात आली आहे. बसस्थानकातील गर्दीचा संशयित व्यक्तीने गैरफायदा घेऊ नये आणि त्याचबरोबर कुणी महिला, युवतींची छेड काढू नये म्हणून बसस्थानक आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा विचार पुढे आला.
सध्या अक्कलकोट बसस्थानकात तेथील पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी हा प्रयोग केला असून, त्याच धर्तीवर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी अन्य बस स्थानके सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव श्रीनिवास जोशी यांच्यासमोर मांडला. जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवून निधी मिळवण्याचा प्रभू आणि श्रीनिवास जोशी प्रयत्न करणार आहेत. निधी मिळाला तर सोलापूरसह अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, अकलूज, करमाळा आणि बार्शी बसस्थानकावर तर मोहोळ, मोडनिंब, टेंभुर्णी, माळशिरस, नातेपुते, जेऊर, वैराग, माढा, वळसंग आणि मैंदर्गी येथील कंट्रोल पॉर्इंटला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा लाभ होणार आहे. बैठकीस पोलीस उपअधीक्षक दिलीप चौगुले, सोलापूर आगाराचे वाहतूक अधीक्षक मुकुंद दळवी, सुरक्षा विभागाच्या सहायक सुरक्षा निरीक्षक संज्योत शिंदे उपस्थित होते. संशयित इसम, वस्तूंबाबत उद्घोषणाबसस्थानक परिसरात संशयितपणे वावरणाऱ्या इसमांची माहिती कळवा, कुठे काय संशयित वस्तू असल्यास त्यास हात लावू नका. त्याची माहिती तातडीने पोलीस आणि आगार प्रमुखांना द्या, असे ध्वनिक्षेपकावर उद्घोषणा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्त एस. वीरेश प्रभू यांनी श्रीनिवास जोशी यांना दिले. दामिनी पथकही सज्ज ठेवणार !बसस्थानकात महिला आणि युवतींची छेड काढणाऱ्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथक सज्ज ठेवण्यात येणार असल्याचेही वीरेश प्रभू यांनी बैठकीत सांगितले. पालकमंत्र्यांनी कॅमेऱ्यासाठी निधी द्यावापालकमंत्री विजयकुमार देशमुख हे परिवहन राज्यमंत्री आहेत. याचा विचार करून त्यांनी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध केल्यास बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत जिल्हा प्रवासी संघाचे संजय पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले.------------------------- काय-काय असणार...साध्या वेषातील महिला पोलिसांचा वावर.कुणी छेड काढली आणि त्याविषयी तोंडी तक्रार करण्याची भीती वाटत असेल तर अशांसाठी तक्रार पेटीची व्यवस्था. ग्रामीण पोलीस दलाकडून तक्रार पेटी मिळणार. प्रत्येक बसस्थानकात संबंधित पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक असलेले फलक लावण्याची व्यवस्था.